तर काय सांगत होतो? सुंदरसा अनुभव. तर हा अनुभव म्हणजे एखादी रंगलेली गप्पांची मैफल असू शकते. किंव्हा एखाद्या दैवताची भेट. किंव्हा एखाद्या स्थळाला दिलेली भेट. एखाद्या भन्नाट पदार्थाची चाखलेली चव. काहीही. बहुधा प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवल्यावर, पुन्हा संधी मिळाल्यावर तो पुन्हा घ्यायचा असा तुम्ही मनोमन ठरवता. आणि इथे तुम्ही थोडे डळमळीत होता.
अगदी सगळ्या गोष्टी जश्याच तश्या जरी घडल्या तरी तो अनुभव तितकाच आनंददायी आणि अविस्मरणीय होईल असं तुम्हाला वाटत नाही. पहिल्यांदा, अगदी अनपेक्षित रित्या, आलेला तो अनुभव, दुसऱ्यांदा, अपेक्षा ठेऊन, ठरवून घेतला तर तितकाच सुंदर ठरेल ह्याबद्दल तुम्हाला खात्री वाटत नाही. खरं तर हा दुसरा अनुभव घेण्याचा प्रयत्न, आधीची आठवण देखील स्पॉइल करेल की काय अशी सार्थ भीती आपल्याला वाटते. माणसाच्या स्वभावाची गंमत आहे की नाही?
मला वाटतं एखाद्या वेळी सगळ्या गोष्टी अनपेक्षितपणे जमून येतात आणि ते प्रसंग यादगार बनून जातात…ह्यात ते अनपेक्षित रित्या होणं सगळ्यात महत्त्वाचं…आणि म्हणूनच तो प्रसंग पुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नवीन आठवणी बनवणं कधीही सोप्पं आणि श्रेयस्कर नाही का? रमेश सिप्पीना देखील शोले सारखा बाप सिनेमा काढल्यावर शान काढल्याचा पश्चाताप झालाच ना?