दिनदर्शिकेप्रमाणे पावसाळा सुरु झाला असला तरी ज्याला मुंबईचा पाऊस म्हणावा त्याचं काही अजून आगमन झालं नव्हतं . खरं तर जून महिना उलटून जुलै देखील सुरु झाला होता. पण अजूनही वर्तमानपत्रात “पावसाची दमदार हजेरी” वगैरे नेहेमीचे मथळे दिसले नव्हते. म्हणजे तसे ढग भरून वगैरे येत होते, बरसत मात्र नव्हते. अगदी राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनासारखे. पोकळ. दिसायला छान. उपयोग मात्र शून्य.
कामाच्या जागी सुद्धा, पावसाळी सहलींचे बेत अजून आखायला सुरवात झाली नव्हती. हे लिहिता लिहिता लक्षात येतंय की पावसाळी सहलीला जाऊन देखील दोनेक वर्षं उलटली आहेत. कोरोना हळू-हळू काढता पाय घेतोय तेव्हा आपणही हळू-हळू पूर्वपदावर यायला हरकत नसावी, नाही का?
तर असं सगळं असताना, आज सकाळी मला जाग आली, तीच मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजाने, आणि मन अगदी मोहरून गेलं. शुक्रवार असल्याने तशीही कामाची फारशी लगबग नव्हती, त्यामुळे ताबडतोब पावसाच्या सोबतीने गरमागरम चहाचा बेत आखला. मी, सौ आणि आमची मुलगी. तिघेच. अर्थात सोबतीला ताजं वर्तमानपत्र.
आभाळ चांगलंच भरून आलं होतं. सगळीकडे अगदी काळवंडून आलं होतं. कोसळणाऱ्या पावसाच्या लयबद्ध आवाजाला, सूं सूं करत वाहणाऱ्या गार वारं चांगली साथ देत होतं. चहा पिता पिता अपरिहार्यपणे पावसाच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली. लहानपणी पाहिलेला बदलापूरचा पाऊस, शाळेत जाताना भेटलेला पाऊस, दप्तर आणि पुस्तकं भिजवणारा पाऊस, शाळा आणि कामाला अचानक सुट्टी देऊन जाणारा पाऊस, रात्रंदिवस धावणाऱ्या रेल्वे गाडयांना बंद पडणारा पाऊस, कामाच्या जागी अडकवून ठेवणारा पाऊस, क्रिकेटचे सामने रद्द करायला लावणारा पाऊस, जुम्मा-पट्टीच्या टेकडीवरून हिरवंगार नेरळ दाखवणारा पाऊस आणि कवितांना नवा अर्थ देणाराही पाऊस.
पावसाची इतकी रूपं पाहूनदेखील इंग्लंडमधला पाऊस मात्र वेगळाच हे मी खात्रीने सांगू शकतो. मुंबईच्या पावसाइतका तो धसमुसळा आणि आक्रमक नाही. मात्र अतिशय लहरी. कधी तासनतास रिपरिप करत राहील तर कधी अचानक गारा बनून अंगावर धावून येईल. म्हणता म्हणता ऊन पडेल आणि पुन्हा मिनिटभरात पिरपिर सुरु आणि ह्या सगळ्या धबडग्यात थंडीला विसरून चालत नाही. म्हणता म्हणता कधी बोटं आणि नाक बधिर होईल सांगता यायचं नाही. गंमत म्हणजे इतका लहरी कारभार असूनदेखील, तिथल्या हवामान खात्याने त्याला गणितात बसवून आपले हवामानाचे अंदाज इतके विश्वसनीय केले आहेत की आश्चर्य वाटावं.
असो. तर पावसाळ्याला खरीखुरी सुरुवात तर झाली आहे. लवकरच सहलींचे बेत आखले जातील. तोपर्यंत घरच्या घरी भजीचे बेत आखायला हरकत नाही. मित्र-मैत्रिणींना बोलावून मैफल करूनही बरेच दिवस झाले. त्यामुळे तोही विचार आहे. यंदा मनसोक्त पुस्तक वाचनाचाही विचार आहे. तिघांचाही. . बऱ्याच दिवसांपासून हरारीचं “सेपियन्स” पुन्हा वाचायला घ्यायचं मनात आहे. त्याच्या सोबतीला नेटफ्लिक्स वगैरे आहेतच. एक दोन थरार मालिका हेरून ठेवल्या आहेत. सलग पाहण्याकरिता. बघूया कसं जमतंय. साथीला पाऊस असेलच.